2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

अमृत महोत्सवी सभागृह भूमिपूजन

सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त सभागृहाचे भूमिपूजन विभागीय आयुक्त दांगट यांच्या हस्ते करण्यात आले. माणसांच्या गरजांसोबत शैक्षणिक क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. आज शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच शिक्षणातील गुणवत्ता सुद्धा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विभागिय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सेलू येथे केले.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी सभागृहाचे भूमिपूजन २ जानेवारी २०१५ रोजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते करण्यात आले. आ. विजयभांबळे, संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, चिटणीस द. रा. कुलकर्णी, डॉ. विनायकराव कोठेकर, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे, उपजिल्हाधिकारी बोरगावकर, अँड. वसंत खारकर, डी. के. देशपांडे यांची उपस्थिती होती. दांगट म्हणाले, सैनिकी आणि शेती शिक्षणाच्या अनिवार्यतेवर भर देतानाच शिक्षणातून माणसाच्या जीवनातील आनंद वाढला पाहिजे, यासाठी शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात परस्पर विश्‍वासाची आवश्यकता महत्त्वाची आहे. यातूनच मानवी मूल्य जपणारा चारित्र्य संपन्न, सुशिक्षीत सहिष्णू समाज निर्माण होईल, असा विश्‍वास दांगट यांनी व्यक्त केले.

गुणवत्तेचे केंद्र म्हणून नूतन संस्थेने देशात ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. 'नूतन'ला लोकाश्रय मिळाला असून, येथील कर्मचारी सर्मपण भावनेने काम करीत असल्याचा गौरव दांगट यांनी केला.

अद्ययावत सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन दांगट यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रामप्रसाद घोडके, सतीश कुलकर्णी, सुधाकर धामणगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक द. रा. कुलकर्णी यांनी केले. भालचंद्र गांजापूरकर यांनी पुस्तक विमोचनासंबंधी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी केले. अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. कोठेकर यांनी सभागृहाबाबत भूमिका विषद केली. कार्यक्रमास नूतन शिक्षण संस्थेचे कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

नूतन संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त सभागृह बांधकामासाठी आ. विजय भांबळे यांनी आमदार निधीतून १0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. संस्थेचे अद्ययावत सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी ही मदत करणार असल्याचे आ. भांबळे यांनी समारंभात बोलताना जाहीर केले.

विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी नूतन शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा विषद करताना संस्थेचे काम दज्रेदार असल्याचे सांगितले.

संस्थेतील कर्मचार्‍यांच्या सर्मपण भावनेमुळे नूतन शिक्षण संस्थेला लोकाश्रय मिळाल्याचा गौरव त्यांनी केला. दांगट यांनी शिक्षण क्षेत्राविषयी मत व्यक्त केले. सेलू शहरातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था असलेल्या 'नूतन'च्या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.