2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

कै.दुर्गाताई द. कुलकर्णीप्रथम स्मृतिदिन

आई हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा मुळ आधार – प्रा. डॉ. रामचंद्र देखणे

 

जग बदलत आहे. पाश्चिमात्य देशातील कुटुंब अस्थिर होत आहेत. पण आपली कुटुंब आजही स्थिर आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्थेचा मुळ आधार हा आई आहे. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. ते नूतन विद्यालयातील कै. रा. ब. गिल्डा सभागृहात रविवार दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी कै. दुर्गाताई द. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वैद्य परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘जीवनोपयोगी सानेगुरूजी आणि आई’ या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथा लेखक तथा ‘जिणे गंगौद्याचे पाणी’ या स्मृतिग्रंथाचे संपादक डॉ. आसाराम लोमटे, डॉ. प्रभाकर देव यांची उपस्थिती होती.

प्रा. डॉ. रामचंद्र देखणे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, 'जीवन मुल्यांच आचरण करणाऱ्या कै.दुर्गाताई कुलकर्णी यांनी ती जीवन मुल्य आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनमानसात रुजवली.साने गुरुजींची श्यामची आई घराघरात पोहोचवली.माणसान जगाव कस,मराव कस आणि कार्य,कर्तृत्वाच्या सुगंधरूपान उराव, दरवळाव कस याचे प्रतिक म्हणजे कै.दुर्गाताई कुलकर्णी. विचार आणि आचार यांची एकरूपता म्हणजे संस्कृती. जिथे सुंदरता असते तिथे वास्तवता असते. साने गुरुजींनी श्यामच्यारूपान मातृत्वाच स्ञोत, मातृप्रेमाच उपनिषद जगायला दिल. हे ज्ञान साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवून मन संस्कारशील करण्याच काम कै. दुर्गाताई कुलकर्णी यांनी केले. ब्रम्हतत्वाच भावरूप म्हणजे आई. जोपर्यंत घराघरात आई विषयीचा कृतज्ञता भाव आहे. तोपर्यंत पांडुरंग विटेवर उभाच आहे.’ असेही प्रा. डॉ. रामचंद्र देखणे आपल्या भाषणात म्हणाले.

कै. दुर्गाताई द. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेतील स्व. सौ. दुर्गाताई द. कुलकर्णी स्मृतिग्रंथालयाचे उद् घाटन आणि ‘जिणे गंगोद्याचे पाणी' या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन प्रा. डॉ. रामचंद्र देखणे आणि सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कथा लेखक तथा स्मृतिग्रंथाचे संपादक डॉ. आसाराम लोमटे यांनी ही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास माजी प्राचार्य द. रा. कुलकर्णी, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डि. के. देशपांडे, सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, संस्थेचे सदस्य, सेलू शहरातील साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, धार्मिक, पञकारीता क्षेञातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीने परिश्रम घेतले. नूतन विद्यालयातील गीत मंचाच्या विद्यार्थीनींनी ‘बल सागर भारत होवो’ हे गीत तर हेमलता देशमुख यांनी पसायदान गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर देव यांनी केले. पाहूण्यांचा परिचय डॉ.अनघा (वैद्य) देशपांडे यांनी करून दिला. सुञसंचालन अशोक लिंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन मिहीर वैद्य यांनी केले.

नूतन कन्या प्रशाला या ठिकाणी आज स्व. सौ. दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालय उदघाटन समारंभ प्रसंगी स्व. दुर्गाताईचे रांगोळी चित्र काढतांना नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक कटारे आर.डी.